Thursday 15 December, 2011

कोल्ह्याला द्राक्ष आंबटच!!!!

"चल भेटु नंतर", मी वळायला लागलो. पण मनोमन एकच इच्छा होती की ती म्हणेल. "थांब ना जरा" . पण ती उलटच बोलली. "हो तुला गेलं पाहीजे ना! कंपनीत काम असतील"
ती बोलली असती तर कंपनीला पण दांडी मारली असती पण कसल काय. मी गपगूमान चालायला लागलो.
म्हटल वळुन बघुया निदान माझ्याकडे बघत तर असेल पण ती खुशाल कुनाबरोबर फोन वर बोलत होती.
मी हताश पणे वळलो,तेवढ्यात एक मंजुळ स्वरात माझे नाव पुकारले गेले. हो तीच होती. मराठी फिल्म मध्ये कसा हिरो slow motion मध्ये हिरोईन कडे धावतो तसा मी धावायला लागलो . सारं जग आनंदाचा वर्षाव करतय अस वाटल.मी तिच्याकडे रोखुन बघु लागलो. ती अस्वस्थ दिसत होती.कदाचित लाजत पण होती. पुढच काय वाक्य असेल याचा अंदाज बांधु लागलो.अंग सेंकदा सेंकदाला शहारत होतं.
ती म्हणाली "तुला कस सांगु, अम् .. अ ..अ "
"बोल ना ,तुला समजु शकतो"
"ठिक आहे,तुला वाईट तर नाही ना वाटणार"
"नाही ग बोल ना"
माझी उत्सुता परमोच्च बिंदुला पोहोचली आणि तितक्याच वरुन खाली कोसळली.
ती निर्लज्ज म्हणते कशी
"अरे माझ्या फोनची बॅटरी संपली, त्याच्या शी बोलायच आहे  आजच्या दिवशी फोन exchange कर ना मी तुला उद्या फोन देते"
नुसता फोन मागितला असता तर एका पायावर तयार झालो असतो ,त्याच्याशी बोलायच आहे हे सांगायची गरज होती का ,आणि हिचं अस सारं पहिलेच आहे मला आजच कळालं,मुर्ख कुठली.खुशाल माझ्याच कडे फोन मागायचा,काही संस्कारच नाही,काही लाज वाटते का तीला?.आणि कसला तो जाडाभरडा आवाज छे! इतकी पण काही सुंदर नाही एवढे नखरे करायला?.खरच आतापर्यंतचा माझा भास होता.
माझ्या रागावर काहिसा ताबा ठेवुनच मी बोललो
"खरच तुला मोबाईल दिला असता गं पण मलाही कुणाचा तरी फोन येणार आहे ,चल मी येतो, ऑफिस मध्ये खुप काम पडली आहे"
आणि तिथून निसटलो

Saturday 5 November, 2011

निरोप

गेलो होतो संपुनी चिता ती रचली होती.
अज्ञान खांद्यानी सरकत पुढे ज्वाला मध्ये जाण्यास तयारी.
पाऊस ,वारा,वादळ अडथळा टाकीत विजवीत होत्या ज्वाला.
पेटन्यास मी उत्सुक तितका जितका पेटवन्यास तो समाज आला.
कित्येक दिवस जगूनी निरोप हा कसला होता
कर्ज नाही फेडले म्हणुनी रडण्याचा का तो आवाज होता.
निदान आता तरी फितुर ,दुष्ट, स्वार्थी ते हाथ झिजले.
श्राध्दाचे जेवन करुनी शब्द दोन माझ्यापरी उष्टे टाकले.
काही मास नाव नी फोटो असाच कुठे टांगला.
जाळण्यास दुसर्‍या गर्दीचा डोंब पुढे सरकला.

Tuesday 2 August, 2011

गणपती\कार्तिक परिक्षा (पुन्हा एकदा)

गणपती श्रेष्ठ की कर्तिक श्रेष्ठ हे बघण्यासाठी शिव-पर्वती दोघांना एक टास्क असाईन करतात की जो कुनी लवकरात लवकर जगभरात आमची महिमा पोहचवेल तोच जिंकेन.कर्तिक लगेच त्याची मोरसिडीज काढतो.जागोजागी शिव-पर्वती महिमा स्पिकर लावुन एकवू लागतो.इकडे गणपती विचार करु लागतो.मागच्यावेळा प्रमाणे शिव-पर्वतीच्या फेर्‍या मारतो पण त्याचा काही उपयोग होत नाही.गणपतीची नजर त्याचे वाहन ‘mouse’ ने खाल्लेल्या अर्ध्या सफरचंदावर जाते.गणपती लगेच फेसबुक,गुगल+ ट्विटर उघडतो आणि मिनीटातच जगभरात शिव-पर्वती महिमा पसरवला जातो,यावेळेसही गणपती विजयी होतो

Wednesday 13 July, 2011

google+ चा जन्म

कोने एके काळाची गोष्ट आहे ज्यावेळेस  ओर्कुट वापरले जायाचे ओर्कुट वर्गातील सर्वात हुशार विद्यार्थी होता तर फेसबुक लास्ट बेंचवर बसायचा पण फेसबुक ने खुप मेहनत घेतली आणि वर्गात पहिला आला. ओर्कुट चा हिरमोड झाला.नंतरची काही वर्ष फेसबुकच प्रथम येत होता.थोड्याच दिवसांनी ओर्कुटने आत्महत्या केली. गुगल त्याची आई कायम म्हणायची 'मेरे बेटे आयेंगे मेरे करन अर्जुन जरुर आयेंगे' आणि गुगल+ चा जन्म झाला

Wednesday 23 March, 2011

प्रेम म्हणजे फुकटचा लोचा आहे


उगाचच कुणाच्यातरी आठवणीत भिजायचय
तासनतास अभ्यास बुडवून कुणाचा तरी विचार करायचाय
आपण लास्ट तर तिने फर्स्ट यायचे आहे
प्रेम म्हणजे फुकटचा लोचा आहे

जिच्यासाठी अविरत झुरायच तिने शांतपणे बघायचय
आम्ही इकडे कासावीस तिने मात्र आरामात रहायचय
दिसली समोर की धडधडने याने वाढवायचे आहे
तिने मात्र अलगद नजर वळवून पुढे जायाचे आहे
प्रेम म्हणजे फुकटचा लोचा आहे

सार्‍या मित्रांशी वैर करुन तिच्या मागे फिरायचय
बाहेर पडताना चार वेळेस आरशात बघायचय
तिच्या एका थॅंक्यु शब्दासांठी कॅन्टीन मध्ये पाकीट खाली करायचे आहे
प्रेम म्हणजे फुकटचा लोचा आहे


कधीतरी हिंम्मत एकटवुन सांगायचय
प्रेमपत्र ,गुलाब लाल बरोबर द्यायचय
मनातल्या भावना समोर बोलुन मोकळ व्यायचय
"आपण चांगले मित्र होऊ" अस म्हणुन तिने मान वळवायची आहे
आपण मात्र तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघताना
तिने कुणा दुसर्‍याच्या हाथात हाथ द्यायचे आहेत
 
प्रेम म्हणेज  ,प्रेम म्हणेज!!! च्यायला  फुकट फालतुचा लोचा आहे

Friday 25 February, 2011

जगणे(वृध्द आजोबाचे मनोगत)

असेच आज चालताना जीवंत आहे का म्हणून बघितले
हात फेरला गालावर तेव्हा सुरुकुत्यानी मला छेडले
किती काळ लोटला असा, असाच मी जगलो
पुन्हा वळून पहिले तर कधीच होतो मेलो

अक्कलबुद्धी शहाण्याची शेवटी मला हो गावली
उपयोग काय त्याचा आता , जीवनमाला माझी सरली

प्रवास तिडका करीत करीत जगणे आमचे राहीले
जेव्हा सुचले जगण्याचे तेव्हा श्वास माझे सरले

मरताना चुकुन वाटते की
जे जगलो ते का होते जगणे
असेच होते जिणे तर का आपण हे जगलो
या प्रश्नाची उत्तर , यमच शेवटी देतो
कळते जेव्हा जगणे त्यावेळेसच तो प्राण घेतो

Friday 11 February, 2011

११ चा शो

        तसं तर काही ठरलं नव्हतं पण जे झाल ते खूप छान होत.कालचा दिवस अविस्मरणीय ठरला.आम्ही सार्‍या मित्रांणी जेवण केले.हॉटेलातून बाहेर पडलो तर बिग सिनेमाच्या थेटर कडे लक्ष गेल.कुणाच्या मनात आल काय माहीत!.पण एक सिनेमा बघुया असा ठराव संमत झाला.पहिले मी व माझा मित्रा जाऊन शो ची चौकशी करण्यास गेलो.मल्टिपलेक्स त्यात रात्रीचा शो म्हणजे 200-250 च चंदन लागणार हे निश्चित म्हणून काही मित्रांच मत सिनेमा न पाहण्यच होत. कुणी घरी जाण्याला उशीर होईल.उद्या ऑफिसला लवकर जायचे अशी कारणे देऊ लागलीत.आम्ही चौकशी करून आलो .प्रत्येक शो चा रेट हा 100 रुपये आहे अस कळालं. जशा सरकारी फाइल मंत्रालयातून गहाळ होतात तसेच सर्वाची कारणे मनातून गहाळ झालीत.जो तो आपल्या परीने स्वःताची कारणे सावरू लागला आणि उद्याच आपण मॅनेज करून घेऊ अस सांगू लागलेत.शो 9:20 चा होता.पण आम्हाला थोडा उशीर झाला होता त्यामुळे तो शो पहाणे मुश्कील होते.नंतरचा शो 11 वाजता होता.
        शो 11 चा म्हणजे घरी जात जात रात्रीचे 2 होणार.अरे बापरे!!!. काहीच जणांकडे बाइक असल्याकारणाने घरी परत जाण्याचा  प्रॉब्लेम.जो तो आपल्या डोक्याचे चक्र फिरवू लागला.आपण असं करू आपण तसं करू अशा प्रकारची कुजबुज चालू लागली.सिनेमा कुठल्याही परिस्थीत पाहण्याचा एवढा निश्चित होत.आता काही झाल तरीही सिनेमा बघायचाच असा ठरलं पण....
        पण ....असं होत की आमच्या बरोबर जेवणाला 3-4 मुली पण होत्या.ते ही सिनेमा पाहण्याचा हट्ट करु लागलेत .ज्यांना त्यांना रात्री घरी पोहचवायचे म्हणजे डोक्याला मोठा ताप.म्हणून काय तर आमचं आज पिक्चर पहाणे रद्द होणार होते.मग जो तो हताशपणे निघायला लागला.तोच एक भन्नाट कल्पना एका मित्राच्या मनात आली.सर्व मूलीना गुमाने जाऊ दिले.आम्ही ही घरी चाललो असा अभिनय केला.मुली गेल्यानंतर आम्ही पुन्हा थेटर जवळ आलो.11 वाजे चा शो बघितला.सिनेमा एवढा खास नव्हता पण इतका सारा आटापिटा केल्यानंतर तो सिनेमा चांगला वाटला.  
       आम्ही एकूण 9 जण होतो आणि बाइक ३ होत्या. एका एका बाइक वर 3 जण रूम कडे निघालो .आम्हा सर्वाना एकाच रूम ला थांबायाचे असे ठरले.रात्रीचे 2 वाजले होते.उद्या सकाळी ऑफीस ला जायचे होते.डोळ्यात झोप मावत नव्हती.हाइवे ने सुसाट निघालो.तोच एका पोलिसाने अडवले.गाडी बाजूला घेण्यास सांगितली.एका गाडी वर तीन कसे अशी विचारणा करू लागले .गाडी ची कागदपत्रे वैगरे विचारू लागले. डोळ्यात आलेली सारी झोप उडाली.आता काय होणार या चिंतेत आम्ही पडलो.खटला भरू दंड करू अशा प्रकारची बोली बच्चण ते करू लागले.पहिल्यादा एका इमानदार पोलिसाचा आम्हाला राग आला होता.तोच एक रिक्षा तिथे आली त्यात सहा लोक बसले होते.रिक्षा ओवरलोड केली त्यामुळे पोलिसांनी अडवली होती.त्या रिक्षावाल्याने आपली ओळख इथल्या नगरसेवकाशी असल्याचे सांगितले.पोलिसाने काडीचा प्रश्न न विचारता त्याला जाऊ दिले.आम्ही हे सारे बघत होतो .जवळ जवळ अर्धा तास आम्ही तिघे थांबलो होतो.बाकीच्या दोन बाइक च्या मित्रांनी वेळीच प्रसंगावधान दाखवले व पटापट गाडीवरुन उड्या मारल्या होत्या फक्त आमचीच गाडी पोलिसांनी अडवली होती .मला वाटलं 100-200 रुपये देऊन सुटका होईल पण बराच वेळ आम्ही आळस देत उभे होतो. थोडा वेळ गेल्यावर पोलिसाने आम्हाला जाऊ दिले.किती मानधन द्यावे लागले विचारू नका.रूम वर पोहचता पोहचता 3 वाजले होते.रूम वर येताच जो तो जागा पकडून 4-5 तासासाठी झोपेत गेला.एक गोष्ट पक्की आजच्या दिवसाची संपूर्ण कथा त्या सिनेमा पेक्षा ही चांगली होती. इतके मी ठाम म्हणू शकतो.पण आमच्या गोष्टी चा क्लाइमॅक्स बाकी आहे.कारण त्या मूलींना माहीत नाही की आम्ही त्यांना लपवून सिनेमा बघितला.

Wednesday 2 February, 2011

लेक्चर आणि विद्यार्थी(?)

       कॉलेज ते कोणते का असेना ,थोडेही स्वातंत्र्य नसेल तर कंटाळवाणेच असते.माझ्या कॉलेज मध्ये कमालीची शिस्त होती. एखाद्या दिवशी तुम्ही एकही लेक्चर बंक(दांडी मारलीत) केलेत तर दुसरया दिवशी ते लेक्चरर तुमच्या कड़े असे बघणार जसे की एखादी जेलर दहा खून केलेल्या गुन्हेगारांकड़े बघतो आणि असाईनमेंट रूपी शिक्षा मिळते ती वेगळी गोष्ट !. 80% हजेरी सक्तिचि असते ती नसेल तर मग साऱ्या शिक्षकाकडून पूर्वज आठवले जातात. सारे लेक्चर एका तास मध्ये बोलतात    जे कि अर्ध्या अधिक डोक्यावरून जात असे.काहीही न समजता सर्व समजल्या जाण्याचे भाव करायचे या पेक्षा मोठा अभिनय मी कधी केला नाही.कॉलेजच्या सुरवातीला मी सर्वात पुढच्या बेंच वर बसायचो.जसे हळूहळू दिवस पुढे सरकू लागले तसा तसा मी पण एक एक ओळीने मागच्या बेंच वर सरकत होतो.आणि एक दिवस शेवटचा बेंच गाठला.शेवटच्या बेंचची मज्जा काही वेगळीच असते. दूर असल्यामुळे सरांचे आमच्या हालचालीवर लक्ष कमी असते.मागे बसायची इतकी सवय झाली होती  की मी वर्गात पहिला जरी आलो(म्हणजे वर्गातील एंट्री म्हणतोय) तरी शेवटच्या बेंच वरच बसायचो. माझ्या बरोबर 10-12 मित्राना पण मागच्या बेंच वर बसणे आवडायचे. आम्हा बॅक बेंचर ची एक स्पेशल कम्यूनिटी बनली होती आणि दिवसेंदिवस ती वाढत चालली होती.साठ मूलाच्या वर्गात फ़क्त 15-20 मूलाना पुढे बसु वाटायचे.कॉलेज बंक करता येत नाही,लेक्चर कंपल्सरी म्हनून मानसिक थकवा काढण्यासाठी लास्ट बेंच एक चांगली जागा होती.
        तरी पण लास्ट बेंच प्रत्येक वेळेस चांगली जागा नाही.एका सरांचे निरीक्षण चांगले होते. आणि लास्ट बेंचचे  लक्ष देत नाही असं त्याना समजल.सरांनी  10 मिनीट शिकवले.माझे लक्ष नाही असे कदाचित त्याच्या लक्षात आले आणि मला प्रश्न विचारला गेला.
What is Rein force Cement concrete(RCC)
माझी तर बोलतीच बंद झाली
Rein force  …..” माझ्या बाजूला असलेल्या मित्राच्या पायावर पाय देऊन काहीतरी सांगचा इशारा केला.पण तो मान डोलवून नाही म्हणू लागला. मी गप्पच उभा राहिलो.काहीच येईना,लक्ष नव्हत.मग सरांनी  एक रागीट नजर माझ्यावर मारली.मी मान खाली घातली.
You dont know a simple defination.”खूप जोरात ओरडले
सारा वर्ग माझ्याकडे बघत होता.जसा काही मी मोठा हीरो वाया चाललो होतो.
“Dont be such dumb .tell me something about it
काय सांगणार.लेक्चर च्या सुरुवातीपासून झोप लागत होती.विविध रंगी स्वप्न मी पाहत होतो.आणि हा असला प्रश्न म्हणजे सार्‍या रंगात काळा रंगा मिळवल्यासारखा झाल.
“Today u have assignment !! write down RCC defination on notebook 5 times,show me it tomorrow
मी बैलासारखी मान डोलवली.मग प्रश्नोत्तरचा खेळ थांबला.त्यानंतर पूर्ण वेळ मी लक्ष देऊन होतो.काही गोष्टी समजल्या पण त्यावर एकही प्रश्न विचारला गेला नाही.ज्या गोष्टी आपल्याला माहीत असतात त्यावर हे सर कधीच विचारत नाही.ज्या गोष्टी नाही माहीत त्यावरच विचारतात.सुरुवातीला मला प्रत्येक लेक्चरला झोप लागायची,डुलक्या देत सारं कॉलेज करायचो.पण आजच्या लेक्चरने माझी झोप उडवली.रात्री 2 पर्यंत मी RCC ची व्याख्या शोधत होतो.छोटीतली छोटी व्याख्या शोधून ती पाचवेळा लिहिली. RCC समजल की नाही ती वेगळी गोष्ट आहे पण शुद्धलेखनाचा सराव झाला इतकेच. ही असाइनमेंट आणि काही विषयाच्या असाइनमेंट करत हातचे तुकडे पडण्याची वेळ आली.
         प्रत्येक विषयाच्या काहीना काही असाइनमेंट असायच्या.आणि प्रत्येक सरांना उद्याच हव्या असायच्या.पुर्ण नाही केल्यातर वर्गात उभे राहावे लागायचे.मी बर्‍याच वेळा उभा ही राहिलो होतो.माझ्या बरोबर अनेक मित्र  संगतीला असायचे.रात्री ठरवून घ्यायच की उद्या किती तास उभ रहायचय आणि त्यानुसार असाइनमेंट लिहायच्या.काही जण नियमीतपणाने असाइनमेंट लिहून आणायचे.मला वाटते ती मूल मागच्या जन्मी कारकून असावित.
        इंजिनियरिंग चे एक सूत्र आहे. Engineering intrest is inversaly proportional to year. म्हणजे जसे जसे तुम्ही  एका वर्षातून दुसऱ्यावर्षात जातात तसा तसा तुमची  इंजिनियरिंग ची आवड  कमी कमी होत जाते.पहिले काही दिवस नियमीतपणाने अभ्यास करणे.अभ्यासाच्या गप्पा मारणे वैगरे वैगरे असते.पण मग 15-20 दिवसमध्येच सारे लेक्चर तुमचा असा प्राण काढून घेतात की अभ्यास ही एक शिक्षा बनून जाते.प्रत्येक लेक्चर तुम्हाला असह्य होते.तुमच्या म्हणण्याला काही वाव नाही.ते जे शिकवतात तसे टालक्यात ओतायचे असते.कुठलाही प्रश्न  न  विचारता(कोण मुर्ख प्रश्न विचारुन पायात दगड मारुन घेईल).तसही सरांची काहीही चुक नाही असे मला वाटते ही education सिस्टम त्यांना तसे बनवते.इतक्या वेळात इतका अभ्यासक्रम पूर्ण करा.कॉलेजचे वेगळे नियम. मुलाना इतक्या असाइनमेंट देत रहा. आठवड्यातून अमुक अमुक टेस्ट झाल्याच पाहिजे.ज्याच्या असाइनमेंट पूर्ण , ज्यांना टेस्ट मध्ये चांगले मार्क त्यांनाच final termwork ला चांगले मार्क. असा नियम सर पाळत असतात. आम्ही सारे विद्यार्थी(?) शेतात राबणाऱ्या  बैलासारखे मर मर करून आमचे काम पूर्ण करत असतो(आणि आम्हाला पोळ्याची सुट्टी पण नसते).काही राहीले तर चाबुक रूपी शब्द आम्हाला सुजवत असतातच.नको नको त्या नियमानी  आमच्या इच्छा इथे शेकवल्या जातात.जो तो सरांना दोष देऊन मोकळा होतो. पण  आपण सर्व ह्या sytem चेच भाग असतो.इतका सारा आटापिटा करुन किती technicle knowledge मिळते हे वेगळी सांगण्यची गरज नाही. कॉलेज च्या यूनिट टेस्ट संपत नाही तोच सबमिशन येते.आणि सरते शेवटी ब्रम्ह परीक्षा घ्यायला university उभी राहते.
        कॉलेजचे  8 तासच वेळापत्रक .एका मागून एक लेक्चरची फाइरिंग केली जाते आणि आम्ही विद्यार्थी घायाळ होत जातो.1 तासाचे एक लेक्चर.दिवसभरातून आलेला थकवा रात्री निघत नाही. रात्री असतातच डजनभर असाइनमेंट वाट बघत.मग दुसऱ्यादिवशी लेक्चर मध्ये झोप लागणारच.लेक्चर मध्ये लक्ष नाही.लेक्चर ची बमबार्डिंग नको होते.नुसते हेच नाही प्रश्न विचारले तर आठवून उत्तर ही द्यायचे असते.
        लेक्चर म्हणजे एक  कैदखाना असतो .जसे लेक्चर सुटले तसे आम्ही सुटकेचा निश्वास टाकायचो.एका वेळेस बर्‍याचजणांचा सुटलेला श्वास फार मधुर वाटायचा! निदान मला तरी.कारण यानंतर जेवणाची सुट्टी व्हायची नाहीतर दिवसाची सुट्टी व्हायची.जेवणाची सुट्टी असेल तर काहीवेळा पुरतेच हे श्वास मोकळे व्हायचे.मग धावत पळत मेस वर जायचे . कसेबसे घास कोंबायचे आणि पुन्हा लेक्चर ला हजार व्हयायचे.जेवण झाल्यानंतर   चे लेक्चर म्हणजे कुंभकर्णा समोर गीता वाचल्यासारखे आहे.अशी झोप लागत असे की त्यात हा कैदखाना म्हणजे आमचा अंत पाहत असायचा.मी लास्ट बेंच वर असल्यामुळे माझ्या डुलक्या सहसा सरांना दिसत नसे.पण काही जणाच्या दिसून जात. त्यावेळेस मात्र त्या विद्यार्थ्याची धडकत नसायची.असलाच प्रसंग एक मित्र मंगेश वर्गात घोरत होता. ते सरांना कळालं.शेजारच्या मुलाला मंगेशला  उठवायला  सांगितल .थोड्याश्या झोपेमुळे मंगेश चे डोळे लाल झाले होते.पण त्याही पेक्षा सरांचे डोळे जास्त लाल झाले होते.मंगेश वर  जोरात ओरडले.त्या ओरडण्यामुळे माझी अर्धी लागलेली झोप उडाली.काय चाललाय म्हणून बाजूलच्याला विचारल.सर  मंगेशला चांगलेच झापु लागले. सर्व वर्ग त्याच्याकडे पाहत होता .आजचा हीरो तो होता.मंगेश बिचारा गप्प पणे   ऐकत होता. पण चिडून बोलतानाही सर  एक वाक्य कॉमेडी बोलून गेले.
      “अरे गाढवा!!! तमाशात नाचणार्‍या बाईला जर टाळ्याची साद मिळाली नाहीतर तिचाही उत्साह कमी होतो.निदान माझ्या लेक्चरला तरी लक्ष दे”   काय भयाण उपमा वापरली होती.पण काहीही असो त्यामुळे थोडे तरी हस्य सर्वाच्या मुखावर आले.
       काहीतरी शब्द लेक्चर मध्ये कानावर पडत असतात.हाच त्या लेक्चरचा फायदा.  पर्याय नसल्यामुळे लेक्चरची बेडी  सर्वाच्या पायात इंजिनियरिंगच्या ४ वर्षात असतेच. जसे जीवित प्रण्याला मरण अपरिहार्य आहे तसेच इंजिनियरिंग विद्यार्थ्यासाठी लेक्चर अपरिहार्य आहे .

Thursday 27 January, 2011

चाकोरीतले जीवन

तुझेच मन तुझेच अन्तरंग तुलाच फसवत आहे
मग कशास आशा जिंकण्याची, तूच तुला हरवत आहे

सामान्याच्याच  तू गर्दीतला गर्दीचाच तू भाग आहे
कशास उकडे तुला गर्दीतून ,तुझीच उष्णता तुला खात आहे

एकच दिनचर्या एकच रंग,याच रंगात तू भिजला आहे
कशास स्वप्न जागृत होण्याचे,ज्या स्वप्नात तू निजला आहे 

नित्यनियमाने जाता जाता एकदिवस मरण गाठायचे आहे
कशास भीती अशा मरण्याची ,तुझे जगणे तुला शोधायचे आहे

Tuesday 18 January, 2011

कथा-पटकथा-संवाद

         मला बर्‍याच दिवसापासून असा प्रश्न पडायचा की चित्रपटामधील कथा-पटकथा-संवाद यामध्ये फरक काय.जसा जसा मी या गोष्टीचा अभ्यास करू लागलो तसा या गोष्टीचा गोंधळ कमी होत गेला.कथा म्हणजे संपूर्ण चित्रपटाचा थोडक्यात परिचय. म्हणजे उदाहणार्थ लगान चित्रपट घेऊया याची कथा काय.तीन वर्षाचा लगान माफ व्हावा यासाठी एका इंग्रज  आणि भुवन ची क्रिकेट मॅचवर पैज लागते आणि ती मॅच भुवन जिंकतो व सार्‍या प्रदेशाचा तीन वर्षाचा लगान माफ होतो.लगान ची कथा एक ओळीत झाली.कथा एका ओळिपासून  8-10 ओळिपर्यन्त असु शकते.
       पटकथा म्हणजे थोडक्यात घटनाक्रम.8-10 दहा ओळिच्या कथेचा विस्तार पटकथेमध्ये होतो.पटकथा मध्ये फक्त घटनाक्रम अपेक्षित असतो.संवाद नाही. उदाहणार्थ:भुवन आणि त्याचे मित्र लपून क्रिकेट पाहत असतात.त्याना तो खेळ अनोळखी असतो.    ते खेळाबद्दल आपापले अंदाज  व्यक्त करू लागतात. तोच बॅट्समन ने मारलेला बॉल त्याच्याजवळ येतो. आणि वैगरे वैगरे अशी ही  पटकथा असते.संवाद हे पटकथे वरुन लिहिले जातात.कहिवेळेस पटकथा लिहिणारे वेगळे अणि संवाद लिहिणारे वेगळे असतात.पण प्रत्येक वेळेस पटकथा लिहिली जाते अस नाही. ते चित्रपटाच्या प्रक्रीये नुसार ठरते.कथा पटकथाकार आणि संवाद लिहिणारा जर एकच असेल तर बहुधा लेखक पटकथा न लिहिता प्रत्येक्ष संवाद लिहिण्यास घेतो.या संपूर्ण लिखाणाला फिल्म इंडस्ट्री मध्ये format  असतो.तो अभ्यासुनच  कथा-पटकथा-संवाद लिहायचे असतात.

Thursday 6 January, 2011

अबोल प्रीत

कळून गेले सारे तरी बोलली नाही काही
वर्षे लोटली किती , पण परिस्थिती बदलली नाही

आम्ही वेडे खुळे  ,मागे लागलो का ग
तुच सांग आता, आम्ही मूर्ख का ग

लाज का वाटते आहे,प्रीत सांगण्याची
भीती का वाटते आहे,हृदय मागण्याची

तुला सांगण्याची ,भीती वाटते का ग
दे मला ग्वाही, पाहु वाट का ग

बंध का तोडत नाहीस ,मी वाट पाहत आहे
कधी येशील मिठीत  , स्वप्न मी सजवित आहे.


नाही बोलत माझ्याशी,घायाळ झालीस का ग
चिंब झालिस तू, अश्रुत न्हालीस का ग

वेळेचे ही बंधन तुजला , पाळायाचे आहे
कुठ पर्यंत वाट पाहु ,मरण्याचे श्वास आहे

वाट पाहण्याची ,कास धरतेस  का ग
प्रेम पडताळण्याची , परीक्षा घेतेस का ग

Wednesday 5 January, 2011

आम्ही मनाचे राजे

फिरुनी पाठ स्वप्नानी ,जगावयास आम्हा शिकवले
शिळे अर्थ लावूनि  ,भुलावयास आम्हा शिकवले

प्रयत्नाची कास धरली,हाती घेतली कामं
जगणे म्हणून जगणे झाले,नाही उरला राम

नशीब मानिले तर थट्टा आमची करता
काय ठावे तुम्हाला प्रश्न कसले विचारता

हळवी मन झाली आमची, परी फुटला ना त्याना पाझर
नको आहे ताप मज,केवळ यातनाचा इथे सागर

आज ना उद्या येईल असे, अर्थ शिकवतील जगण्याला
भाकित करितो आज जसे,जिंकून घेतील मरण्याला

पुरे पुरे आता, जगू द्या मजला माझे
काय पुसता आम्हाला ,आम्ही मनाचे राजे

आम्ही आनंदी कसे

काही ओघळती शब्द रडिचे ,आपसूक अश्रू मी प्यायचे
भाव आतला बाहेर नसे ,विचारती लोक तुम्ही आनंदी कसे

सोहळे मांडले जखमाचे,नाही उघडे करतसे
चेहर्‍यावर माझे खोटे हसे, विचारती लोक तुम्ही आनंदी कसे

आले लोक भेटायला,दुख बाजूला ठेवत असे
एकूण स्वर माझे ,विचारती लोक तुम्ही आनंदी कसे

जानले न भाव  कुणी मनाचे,जानले मी सर्वाचे
दाखवया गेलो जेव्हा ,विचारती लोक तुम्ही आनंदी कसे

Tuesday 4 January, 2011

शोधीत होतो वाट जीवना

शोधीत  होतो वाट जीवना, अंधार डोळी दाटला
नाही मिळाला अर्थ जीवना, राग उदरी साठला

नाही अपेक्षा कसली, श्वास तो घेत होतो
का कळेना आस जीवाची ,आमरण जळत होतो

फूल बनूणी समोर आली, तीच माझी वहिवाट झाली
चालन्यास गेलो तेव्हा काट्याची बरसात झाली

बघत होतो चेहरे सारे ,दर्पण पाहणे राहीले
गीत जे झाले मनी ,तेच एकणे राहीले

Monday 3 January, 2011

हवालदिल बंडू काका

      
        बंडू काका नेहमी बोलायचे की मला एक सुंदर घर बांधायचे आहे.आणि खूप वर्षाची इच्छा ती या वर्षी पूर्ण झाली.बंडू काकांनी     फार सुंदर घर बांधले.एक पिक्चर ची शूटिंग यात करता येईल आणि एखादी हेरॉईन घराला बघून म्हणेल  " अय्या इतके सुंदर घर मी माझ्या आयुष्यात पहिले नाही "(या अलंकारा ला अतिशयोक्ती अलंकार म्हणतात).बंडू काकांनी  घरात हव्या तितक्या सुख सुविधा  करवून घेतल्या.एखाद्या फिल्मी स्टाइल सारखा टाइगर नावाचा डोबरमँन कुत्रा पण पळून घेतला. या कुत्र्याचा आणखी एक उपयोग बंडू काका करतात तो म्हणजे नको असलेल्या पाहुन्याना घाबरवण्यासाठी!.
     सर्व गोष्टि नीटनेटक्या केल्या आहेत.बंडू काकांनी  किचन फार मोठा घेतला आहे.सुरुवातीला किचन फार रिकामा वाटायचा.खूप सारे भांडे असतानाही रूम च्या साइज़ मुळे तो रिकामा वाटायचा. बंडू काकांना ते सहन झाले नाही. किचन पूर्ण भरलेले वाटत नाही तोपर्यंत भांडे विकत घेऊन ते किचन मध्ये रचून ठेवले.ज्या वेळेस मी या किचन चा अवतार पहिल्यादा पहिला त्यावेळेस मला वाटले की बंडू काकांनी भांड्याच दुकान सुरू केला की काय!.लोक म्हैस घेतली म्हणून बादली विकत घेतात.पण इथे गोष्ट उलटी आहे बादली घेतली म्हणून म्हैस विकत घेतल्याचा प्रकार आहे.
      आज मी सहजच बंडू काका  कडे गेलो.काका चा चेहरा उदास होता. मी कारण खूप वेळा विचारण्याचा प्रयत्न केला.पण काही केल तरी ते मला सांगत नव्हते.शेवटी मी काकूना विचारले तेव्हा मला सविस्तर माहिती मिळाली.
     दगडू पाटील शेजारी राहायला आले.शेजारच्याची विचारपूस करावी म्हणून घरी आले  होते.एवढे सुंदर घर पाहून ते पण भारावून गेले .त्यानी दारावरची बेल वाजवली.काका नि दरवाजा उघडला.   
      काका  उवाच " कोण आपण "
      दगडू पाटील उवाच " मी इथे शेजारी नवीन राहायला आलो.मला इथल्या मालकणा भेटायचाय"
      काका उवाच "हो मीच या घरचा मालक"
       दगडू पाटील " अहो इथल्या खऱ्या खुर्‍या मालकाला भेटायचाय"
      काका त्याना केविलवण्या पद्धतीने समजाऊ लागले पण दगडू पाटील समजण्याच्या  तयारीतच  नव्हते.हा वाद विवाद काकू नि एकला आणि त्या धावत पळत तिथे आल्या. आणि हेच या घरचे मालक आणि मी याची बायको अशी ओळख करवून दिली.नशीब काकुचा तरी त्यानी ऐकलं.
    दगडू पाटील उवाच "माफ करा हं मी तुम्हाला समजण्यात चुक केली. इतक्या मोठ्या घरचे  मालक असे  असतील  अस नव्हत वाटल ."
     त्या एकाच वाक्याचा जो काय काय अर्थ निघाला असेल ते मलाही मांडता येण शक्य नाही.घटना तशी मोठी नाही पण बंडू काकांनी तो आपला अपमान वाटला.म्हणून तर काय ते आज उदास होते.आणि न राहवून  बंडू काका बोलून गेले."सभवतालच्या गोष्टिना सुंदर बनवता बनवता मी त्याबरोबर स्वताला  बदलवण्याच राहून गेलो.घर तर सुंदर बांधले पण त्या घरात राहण्याच्या लायकी चा मी नाही राहिलो."   
    आज एक शिकावण मिळाली.आपणच बदलणारया ,घडवणारया  गोष्टीना देखील स्वताचे अनुकुलन हवेच असते.